दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०२५: प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली के. सी. या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला
या सामन्यात दबंग दिल्लीने ३१- २८ गुणांनी बाजी मारत प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धतील जेतेपदाचा मान पटकावला.
त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात दबंग दिल्लीकडून नीरज नरवालने सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली. तर अजिंक्य पवारने ६ गुण कमावले. पुणेरी पलटनकडून आदित्य शिंदेने आपलं सुपर १० पूर्ण केलं. पण शेवटच्या मिनिटाला सामना फिरला आणि दबंग दिल्लीने बाजी मारली.
अंतिम सामन्यातही कर्णधार अस्लम इनामदार पहिली चढाई करण्यासाठी आला. पहिल्याच चढाईत त्याने बोनस घेऊन संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आशू मलिकची पहिल्याच चढाईत पकड झाली होती. पण पंचांनी त्याला सेफ घोषित केलं. यासह दबंग दिल्लीनेही आपलं खातं उघडलं. डू ओर डाय रेडमध्ये पंकज मोहितेने १ गुण घेत गुणांसख्येत भर घातली. सुरुवातीची ५ मिनिटे झाल्यानंतर दबंग दिल्लीचा संघ ६-४ गुणांसह २ गुणांनी आघाडीवर होता. पूर्वार्धातील सुरुवातीच्या १० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दबंग दिल्लीचा संघ ८-६ गुणांसह २ गुणांनी आघाडीवर होता.
पूर्वार्धातील पुढील १० मिनिटांमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. १३ व्या मिनिटाला पुणेरी पलटनने तिसऱ्यांदा सुपर टॅकल करून गुणसंख्येत आणखी २ गुणांची भर घातली. पण त्यानंतर पुणेरी पलटनचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यासह दबंग दिल्लीने आणखी ४ गुणांची भर घालत १४- ८ गुणांसह ६ गुणांनी आघाडी घेतली.
या सामन्यातील पूर्वार्धातील २० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दबंग दिल्लीचा संघ २०-१४ गुणांसह ६ गुणांनी आघाडीवर होता. दिल्लीने आपली आघाडी कायम ठेवली. उत्तरार्धातील १० मिनिटांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर दबंग दिल्लीचा संघ २४-१८ गुणांसह ६ गुणांनी आघाडीवर होता.
सामन्यातील शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना दबंग दिल्लीचा संघ २७-२० गुणांसह ७ गुणांनी आघाडीवर होता. त्यामुळे पुणेरी पलटनला ७ गुणांची पिछाडी भरून काढायची होती. शेवटची ३ मिनिटे शिल्लक असताना दबंग दिल्लीचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. त्यामुळे पुणेरी पलटनने पिछाडी कमी करून गुणसंख्या २८-२५ गुणांवर आणली. शेवटचा १ मिनिट शिल्लक असताना आदित्य शिंदेने २ गुण घेत गुणसंख्या २९-२७ वर पोहोचवली. शेवटी दबंग दिल्लीने हा सामना ३१-२८ गुणांच्या फरकाने आपल्या नावावर केला.
ALSO, READ: Nano Machine chapter 285 release date, time, spoilers and where to read


